25 Ideas for 2025 ही या नववर्षाच्या आरंभी केलेली post अनेकांना आवडली. 22500 पेक्षा जास्त वाचकांपर्यंत ही post पोहोचली आहे. त्यानंतर अनेकांनी या post ला मराठीत पण टाकावे असे सुचवले होते. त्यानुसार ही post मराठीत भाषांतरित करून टाकत आहे.
वर्ष 2025 सुरु होऊन दोन महिन्यांहून जास्त काळ निघूनही गेला आहे. अशाच गतीने हे जग पुढे जात आहे, मात्र या गतिशील जगात आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य जपणे क्रमप्राप्त झाले आहे. या लेखातील 25 लक्षवेधक संकल्पना नक्कीच तुम्हाला चांगले आयुष्य जगण्यास मदत करतील.
स्रोत: Twitter/X posts of @SahilBloom

1. वेळेची दृष्यकल्पना करा
कौटुंबिक वेळ मर्यादित आहे – त्याची जपणूक करा.
मैत्रीचा वेळ मर्यादित आहे – खऱ्या मैत्रीला वेळ द्या.
जोडीदारासोबतचा वेळ महत्त्वाचा आहे – तडजोड करू नका.
मुलांसोबतचा वेळ मौल्यवान आहे – तो अनुभवा.
सहकर्मींसोबत चा वेळ महत्त्वाचा आहे – तो ऊर्जेने व्यतीत करा.
एकांतातला वेळ सर्वाधिक आहे – स्वतःवर प्रेम करा.
2. दुःख समयीचे मित्र
आपले बहुतांश मित्र हे खरे मित्र नसतात. ते फक्त क्षणिक आनंद किंवा आपले मूल्य बघून सोबत राहतात.
खरे मित्र ते असतात जे दुःख समयी साथ देतात.
अशा मैत्रीची जपणूक करा.
कोणाचे तरी दुःख समयीचे मित्र व्हा.
3. दोन दिवसांचा नियम
कुठलीही सवय अंगीकारण्यासाठी ती गोष्ट रोज करा आणि कुठल्याही परिस्थितीत सलग दोन दिवस खंड पाडणे टाळा.
या नियमामुळे सवयी बाबत सकारात्मक प्रगती होते, व अचानक उद्भवणाऱ्या विषायांमुळे त्यात बाधा येत नाही.
4. लाटांवर स्वार होण्याची मनोवृत्ती
समुद्रात सर्फिंग करताना तो व्यक्ती लाटांवर स्वार होतो आणि तो क्षण पुरेपूर उपभोगतो. ही लाट ओसरणार आणि आपण पुन्हा खाली येणार हे माहिती असूनही तो क्षण आनंददायक ठरतो.
अशा प्रकारच्या लाटांचा आस्वाद घ्या. एक लाट ओसरली तरी दुसरी येईल हे ध्यानात ठेवा.
आयुष्याच्या समुद्रात विहार करताना हे तत्त्व लक्षात ठेवा.
5. फुलं देण्यात कंजुषी नको
एखाद्या व्यक्तीबद्दल चांगली भावना असेल तर त्यांना तसे कळू द्या.
बऱ्याचदा समोरची व्यक्ती आयुष्यातून निघून जाईपर्यंत आपण त्याच्या बद्दलच्या चांगल्या भावना त्यांना कळवत नाही. नंतर फुले वाहून काय उपयोग?
इथून पुढे अश्या भावना वेळीच व्यक्त करा.
6. वेळेचा अब्जाधीश
वेळ ही आपली सर्वात मौल्यवान संपत्ती आहे.
तरुणपणात आपण सगळेच वेळेच्या बाबतीत अब्जाधीश असतो.
मात्र वेळ निघून गेल्यावरच या संपत्तीचे खरे मूल्य आपण जाणतो.
वेळेला पैश्या प्रमाणे समजा – वेळ हीच तुमची संपत्ती आहे आणि एकदा निघून गेल्यावर ती परतून येणार नाही हे लक्षात ठेवा.
7. कमावलेले नशीब
ज्याला आपण नशीब म्हणतो ते खरे तर हजारो छोट्या छोट्या बाबींचे संचित असते.
अशा सवयी बाळगा ज्यामुळे तुम्ही नशिबवान होण्याची शक्यता वाढेल.
नशीब बहादूर व्यक्तीची साथ देते – नशीब फळफळेल असे कर्म करा आणि आपले नशीब स्वतःच कमवा.
8. मुक्त वेळ ही संपत्ती आहे
मोकळा वेळ असणे हे चांगले नाही हा खूप मोठा गैरसमज आहे.
खरे पाहता मोकळा वेळ म्हणजे भविष्यातील संधींना उगवण्यासाठी आवश्यक अशी सुपीक जमीन असते.
भविष्यातील महत्त्वाकांक्षी कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आवश्यक नियोजन आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी हा वेळ वापरला जाऊ शकतो.
9. मेंदूसाठी हालचाल करा
शास्त्रज्ञांनी चालणे या मूलभूत व्यायामप्रकाराचा मुलांच्या बुद्धिमत्तेवर होणाऱ्या सकारात्मक परिणामांचा अभ्यास केला आहे.
हालचालींचा दृश्य परिणाम मुलांची आकलनशक्ती, गणितीय क्षमता आणि शुद्धलेखनात दिसून आला.
हेच तत्त्व प्रौढांसाठी लागू आहे. व्यायाम फक्त सुदृढ शरीरच नव्हे तर तल्लख बुद्धी घडवते.
10. सिंहासारखे काम करा
जेवढा वेळ तुम्ही एखाद्या कामाला द्याल, तेवढे ते काम वाढत जाते असे पार्किन्सन चा नियम सांगतो.
कामासाठी वेळ ठरलेली असल्यास अनुत्पादक पद्धतीने तो वेळ व्यापला जाऊ शकतो. या तत्त्वानुसार जास्त वेळ काम करून साध्य मात्र मर्यादितच राहते.
याचा उपाय म्हणजे सिंहासारखी कार्यपद्धती अंगीकारणे – योग्य वेळेची वाट बघा – ती वेळ येताच झोकून देऊन पूर्ण क्षमतेने काम करा – विश्रांती घ्या – पुन्हा हेच चक्र अंगिकारा.
11. नातेसंबंधांचा चौरस
प्रत्येक नात्यात 2 गुणिले 2 चा चौरस असतो – एका अक्षावर त्याची सुदृढता, आणि दुसऱ्यावर त्यातून मिळणारा आनंद.
सर्वोत्तम नाते ते असतात जे सुदृढ व आनंददायी असतात.
अशी नाती ओळख आणि त्यांची जपणूक करा.
सुदृढ व आनंददायी नसलेली नाती बाजूला सारायला शिका.
12. आयजनहॉवर चा चौरस
महत्त्वपूर्ण आणि तातडीच्या बाबी यातला फरक ओळखायला शिका.
प्रत्येक कार्य 2 गुणिले 2 च्या चौरसावर ठेवा.
महत्त्वाचे व तातडीचे – तात्काळ करा.
महत्त्वाचे पण तातडीचे नाही – नियोजन करा.
महत्त्वाचे नाही पण तातडीचे – करवून घ्या.
महत्त्वाचे नाही व तातडीचे नाही – बाजूला सारा.
13. उपदेशाचा विरोधाभास
जास्त उपदेश ऐकणे हे हानीकारक असते. बहुतेक वेळी सल्ला मसलतीत नुकसानच होते.
उपदेश देणाऱ्यांचा हेतू चांगला असला तरी त्यांची आणि आपली वस्तुस्थिती व परिस्थिती यात खूप फरक असतो.
यशस्वी लोक उपदेश घेतात पण त्यातला गाभा लक्षात घेऊन निवडकपणे त्यांची अंमलबजावणी करतात.
14. पालकांची मुलाखत
आपल्या पालकांची मुलाखत घेऊन रेकॉर्ड करा.
तुमचे बालपण, स्वप्नं, उत्कंठपूर्ण प्रसंग, भीती यावर त्यांना बोलू द्या.
त्यांच्यासोबत मिळणारा वेळ हा एक अमूल्य पण न परतून येणारा ठेवा आहे.
त्यांचे अनुभव सदैव तुमच्या मदतीला असतील.
15. प्रयत्नांचा विरोधाभास
परिणामात सहजता येण्यासाठी खूप असहजता झेलून प्रयत्न करावे लागतात.
सहज सुंदर परिणाम हे खूप खडतर आणि प्रयत्नपूर्वक केलेल्या मेहनतीचे फलित असते.
जे साधे, सरळ, क्षुल्लक वाटते, प्रत्यक्षात तसे नसते.
16. खुले व बंद झालेले मार्ग
जे होऊ शकले नाही अशा गोष्टींविषयी विचार करण्यात आपण खूप वेळ घालवतो.
त्या ऐवजी जे समोर आहे त्यावर लक्ष देणे आवश्यक आहे.
समोर असलेल्या संधीचे महत्त्व कमी लेखणे ही मोठी चूक आहे.
17. प्रकाशझोताचा परिणाम
आपल्या सभोवतालचे बहुतांश लोक स्वतःमध्ये व्यस्त असतात. तुमच्यावर लक्ष ठेवायला त्यांच्याकडे वेळ नसतो.
मात्र आपल्याला नेहमी असे वाटते की सर्वांचे लक्ष प्रकाशझोतात असल्याप्रमाणे सदैव आपल्यावर असते.
या विचारापासून मुक्ती मिळवली तर आपण इतरांना काय वाटेल यात गुंतून न राहता स्वतःला न्याय देऊ शकतो.
18. बौद्धिक विवाद करणारा सहकारी
मित्र सर्वांना असतात पण बौद्धिक विवाद करणारे सहकारी आपल्याला गरजेचे आहेत.
असे सहकारी मिळवणे अवघड आहे.
हे सहकारी तुम्हाला तुमच्या चुका दाखवतील, तुमची गृहितके, विचारधारा, कृती याबाबत प्रश्न विचारतील आणि तुम्हाला सखोल विचार करण्यास बाध्य करतील.
19. खेद कमी करण्याची संरचना
सुखी आयुष्यासाठी खेद व पश्चात्ताप होईल अशी परिस्थिती निर्माण न होऊ देणे हे फार महत्त्वाचे आहे.
कठीण निर्णय घेत असताना भविष्याचा विचार करा. या निर्णयाने मला पश्चात्ताप होईल काय याचा विचार करा आणि त्यानुसार निर्णय घ्या.
खेद किंवा पश्चात्ताप ही अपयशापेक्षा दुःखदायक भावना आहे.
20. पुढील खेळी सर्वात महत्त्वाची आहे
आपल्या समोर असलेल्या प्राप्त परिस्थितीत तुमची पुढची खेळी काय आहे हे सर्वाधिक महत्त्वाचे आहे.
आपण भूतकाळात काय केले किंवा भविष्यकाळात काय होईल यात गुंतून न बसता पुढच्या डावावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
आज सोडून काल किंवा उद्यावर वेळ घालवू नका. उद्याच्या नियोजनाची पायाभरणी आज करा.
21. गतीचा विरोधाभास
गती वाढवण्यापूर्वी थोडा वेळ गती कमी करावी लागते.
ठराविक वेळाने धावपळ कमी करून अनेक फायदे मिळतात.
आपली निर्णय प्रक्रिया अधिक अर्थपूर्ण होते. चुका लक्षात येऊन दुरुस्तीची संधी मिळते.
अधिक उपयुक्त बाबींवर लक्ष केंद्रित करता येते. ऊर्जा and श्रम यांचा योग्य विनियोग करता येतो.
22. 30-30 पद्धत
एखाद्या बाबतीत सुधारणा करायची असल्यास 30-30 पद्धत उपयुक्त ठरते.
रोज 30 मिनिटे
सलग 30 दिवस
वचनबध्दता, दडपण नसणे व चक्रवाढ पद्धतीने होणारी सुधारणा यामुळे हे तंत्र उपयुक्त ठरते.
23. नियमित पुनरावृत्ती पद्धत
नियमित व ठराविक वेळाने पुनरावृत्ती केल्यास संज्ञानात्मक पातळीवर नवीन माहिती साठवून ठेवण्यास मदत होते.
या तंत्रामुळे माहिती अल्पकाळासाठी जतन करण्यात आलेली माहिती दीर्घकाळासाठी जतन होण्यास चालना मिळते.
या पद्धतीत मेंदूने ती माहिती दीर्घकाळासाठी जतन करेपर्यंत वारंवार व ठराविक वेळाने माहितीची आवक होते.
24. विमानप्रवास चाचणी
एखाद्या व्यक्तीची निवड करताना एक साधी पण विश्वासार्ह चाचणी वापरली जाते.
या व्यक्तीसोबत तुम्ही सहा तासांचा विमानप्रवास करण्यासाठी तयार व्हाल काय?
स्वतःशी प्रामाणिक असणारे, भावना समजून घेणारे, सकारात्मक व समोरच्याला मोकळीक देणारे लोक सर्वांना आवडतात.
25. परिणामपेक्षा प्रक्रिया महत्त्वाची
परिणाम आणि साध्य यांच्यावर लक्ष केंद्रीत करून केवळ आकड्यांचा खेळ होतो.
यामध्ये अपेक्षित परिणाम न मिळाल्यास निराशा पदरी पडते.
मात्र प्रक्रियेवर लक्ष केंद्रीत करून काम केल्यास आपण आकड्यांच्या पलीकडे जातो.
या प्रकारे परिणामांची चिंता न करता प्रक्रियेतून शिकणारे लोक निश्चितपणे प्रगती करतात.
very nice,100% Agree every one should follow this.
LikeLiked by 1 person
true sir, very important for these days as families are not only nuclear but everyone is alone…
LikeLiked by 1 person
so beautiful and excellent one. You always give such a relevant thought necessary for social improvement. I always appreciate your efforts….
God bless you…. 🌹🕉️🌹
LikeLiked by 1 person