स्टीव्हन कोवे यांचे The 7 Habits of Highly Effective People (फ्री प्रेस) हे प्रसिद्ध पुस्तक वैयक्तिक आणि व्यावसायिक समस्या सोडवण्यासाठी सर्वांगीण, एकात्मिक, तत्त्व-केंद्रित दृष्टिकोन सादर करते. कोवे या पुस्तकात निष्पक्षता, सचोटी, सेवा आणि मानवी प्रतिष्ठा या तत्त्वांसह जगण्याचा एक सूत्रबद्ध मार्ग प्रस्तुत करतात. ही तत्त्वे आपल्याला बदलाशी जुळवून घेतानाची सुरक्षितता आणि बदलामुळे निर्माण होणाऱ्या संधींचा फायदा घेण्यासाठी चालना देतात.
हे पुस्तक अत्यंत प्रभावी लोकांच्या खालील 7 सवयींबद्दल बोलते:
- स्वयं-सक्रिय व्हा
- अंतिम ध्येय लक्षात घेऊन सुरुवात करा
- प्राधान्याच्या बाबी निश्चित करा
- सर्वसमावेशक यशाचा विचार करा
- समजावून सांगण्यापूर्वी आधी स्वतः समजून घ्या
- समन्वय व ताळमेळ साधा
- शस्त्र धारदार ठेवा
ठळक मुद्दे:
- स्वयं-सक्रिय व्हा
स्वयं-सक्रिय (proactive) लोक स्वतःची जबाबदारी आणि प्रतिसाद-क्षमता ओळखतात. प्राप्त परिस्थितीला कशा प्रकारे सामोरे जायचे हे निवडण्याची क्षमता म्हणजे प्रतिसाद-क्षमता. स्वयं-सक्रिय होण्यासाठी आपण आपल्या विचारार्ह बाबींच्या वर्तुळात असलेल्या प्रभावाच्या वर्तुळावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. म्हणजेच आपण ज्या गोष्टींबद्दल काहीतरी करू शकतो त्यावर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे. आपले विचार आणि कृती, दोन्ही प्रतिक्रियाशील असण्याऐवजी स्वयं-सक्रीय कसे होतील यादृष्टीने आपली वर्तणूक बदल आवश्यक ठरते.
- अंतिम ध्येय लक्षात घेऊन सुरुवात करा
एक सुस्पष्ट ध्येय लक्षात घेऊन नियोजनाची सुरुवात करा. आपल्याला काय बनायचे आहे याची दृष्टी विकसित करण्यासाठी आपण आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करू शकतो आणि आपल्या विवेकबुद्धीचा वापर करून आपल्याला कोणती मूल्ये मार्गदर्शन करतील हे ठरवू शकतो. आपण ध्येय निश्चित करणे आणि ते साध्य करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यापूर्वी आपण आपली मूल्ये आणि तत्व ओळखण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. या प्रक्रियेत आपली स्वतःची वैयक्तिक मूल्ये व्यक्त करण्यासाठी काही बदल आवश्यक ठरतात. तुमच्या जीवनातील व्यावसायिक, वैयक्तिक किंवा सामुदायिक अशा विविध भूमिकांचे पृथक्करण करून तुम्हाला प्रत्येक भुमिकेसाठी तीन ते पाच उद्दिष्टांची यादी करणे क्रमप्राप्त आहे.
- प्राधान्याच्या बाबी निश्चित करा
आपल्यासाठी नेमके कुठले विषय प्राधान्याचे आहेत यावर आपल्या दैनंदिन कृतींची रचना करण्याची शिस्त असली पाहिजे. शिस्त टिकवून ठेवण्यासाठी आणि आपल्या उद्दिष्टांच्या मार्गावर राहण्यासाठी आपल्याला एखादी आवश्यक गोष्ट करायची इच्छा नसतानाही ती करण्याची इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे. आपण कोणत्याही क्षणी आपल्या इच्छा किंवा आवेगांपेक्षा आपल्या मूल्यांनुसार कार्य करणे आवश्यक आहे. सर्व क्रियाकलाप दोन घटकांवर आधारित वर्गीकृत केले जाऊ शकतात: ‘त्वरित’ आणि ‘महत्त्वाचे’. Eisenhower Matrix चा वापर करून कृती योजना तयार करता येईल.
- सर्वसमावेशक यशाचा (win-win) विचार करा
प्रभावी परस्परावलंबी संबंध प्रस्थापित करण्यासाठी सर्व भागधारकांना (stakeholders) लाभदायक आणि समाधानकारक अशा परिस्थिती निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सर्वसमावेशक विचार व कृतीसाठी नैतिक धैर्य व कठोर निर्णयक्षमता असणे क्रमप्राप्त ठरते. सर्वसमावेशक यश साध्य करण्यासाठी पद्धतीपेक्षा परिणामांवर आणि व्यक्ती ऐवजी समस्यांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. Win-win हा विचार स्पर्धेच्या वातावरणात टिकू शकत नाही. यासाठी सर्व भागधारकांना प्रेरित करण्याची प्रणाली उद्दिष्टे आणि मूल्यांसह संरेखित करणे आणि त्यासाठी आवश्यक पायाभूत व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे.
- समजावून सांगण्यापूर्वी आधी स्वतः समजून घ्या
कोणत्याही व्यक्तीशी प्रभावीपणे संवाद साधण्यासाठी आपण सहानुभूतीपूर्वक ऐकून त्यांना आणि त्यांचा दृष्टीकोन खोलवर समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तेव्हाच आपण त्यांना सल्ला देऊ शकू किंवा उपाय सुचवू शकू. तुम्हाला सहानुभूतीपूर्ण ऐकण्याचे कौशल्य विशेष प्रयत्न करून विकसित करावे लागेल.यातून पारदर्शकता आणि विश्वास वाढीस लागतील. जर आपण प्रभावीपणे व सहानुभूतीपूर्वक ऐकण्यास सुरुवात केली तर आपल्याला या सुधारित संवादामध्ये नाट्यमय असे चांगले परिणाम दिसून येतात. संवादाचे अधिष्ठान सहानुभूतीमध्ये असणे महत्वाचे आहे.
- समन्वय व ताळमेळ साधा
दुसर्या व्यक्तीच्या दृष्टीकोनातील फरक समजून घेऊन आणि त्याचे मूल्यमापन करून, आपल्याला समन्वय (synergy) निर्माण करण्याची संधी मिळते. यामुळे पारदर्शकता आणि सर्जनशीलतेद्वारे नवीन संधी निर्माण होण्यास पोषक वातावरण निर्माण होते. नवीन पर्याय तयार करण्यास आणि नवीन शक्यता निर्माण करण्यासाठी ताळमेळ गरजेचा ठरतो. याचा परिणाम म्हणून एकसंघपणे व एकत्रितपणे जुन्या बाधक बाबी बाजूला सारून नाविन्याला वाव देता येतो. समन्वयाचे खरे सार म्हणजे लोकांमधील मानसिक, भावनिक आणि मनोवैज्ञानिक विविधतेला महत्त्व देणे. प्रथम सर्व परीपेक्ष समजून घेण्याचा प्रयत्न करणे, आणि नंतर नवीन शक्यता आणि win-win परिस्थिती तयार करण्यासाठी त्या भिन्न दृष्टीकोनांमधील सामर्थ्य आणि उपयुक्तता यांचा वापर करणे, हाच यशाचा राजमार्ग ठरतो.
- शस्त्र धारदार ठेवा
आपले शरीर, मन व बुद्धी हेच आपले शस्त्र असून त्याची धार कायम ठेवणे गरजेचे ठरते. प्रभावी होण्यासाठी आपण शारीरिक, आध्यात्मिक, मानसिक आणि सामाजिक नवीनीकरणासाठी वेळ काढला पाहिजे. सतत उपयुक्त अशा नव्या विचानांचे अनुसरण केल्याने आपली क्षमता वृद्धिंगत होते. नवीनीकरण ही अशी प्रक्रिया आहे जी आपल्याला वृद्धीच्या आणि सातत्यपूर्ण सुधारणांच्या दिशेने वाटचाल करण्यास सक्षम करते. आपल्या स्वभावाचे चार आयाम आहेत- शारीरिक, आध्यात्मिक, मानसिक आणि सामाजिक-भावनिक: आणि प्रत्येकाला नियमितपणे नवसंजीवनी दिली पाहिजे. आपण क्रियाकलापांची एक सूची तयार केली पाहिजे जी आपल्याला या चार आयामांचे पुनरुज्जीवन करण्यात मदत करेल.
संदर्भ’: https://blog.hubspot.com/
Nice extract .
LikeLiked by 1 person