Deep Work (Grand Central Publishing) मध्ये लेखक कॅल न्यूपोर्टने आजच्या जगातील विचारसरणीच्या विपरीत कल्पना मांडली आहे. विचलित होणे वाईट आहे असा युक्तिवाद करण्याऐवजी, त्याच्या विरुद्ध ‘गहन कार्यशैली’ या संकल्पनेला या पुस्तकात प्रकाशझोतात आणले आहे. सांस्कृतिक टिप्पणी आणि कृती करण्यायोग्य सल्ला यांच्या माध्यमातून Deep Work वाचकांना संस्मरणीय किस्से आणि अर्थपूर्ण उपदेश यांच्या गावी घेऊन जाते. या पुस्तकाची दोन भागांमध्ये विभागणी केली आहे- त्यात लेखक प्रथम असे मांडतो की कोणत्याही व्यवसायात गहन कार्यशैली जोपासल्यास मोठ्या प्रमाणात फायदे मिळतील. द्वितीय भागात या कौशल्याला पाठबळ देण्यासाठी तुमची मानसिकता आणि सवयी बदलण्यासाठी एक कठोर प्रशिक्षण पद्धत चार नियमांची मालिका म्हणून सादर केली आहे. विचलित जगात लक्ष केंद्रित करून यश मिळवणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक एक अपरिहार्य मार्गदर्शक म्हणून उपयुक्त आहे.
ठळक मुद्दे:
- गहन कार्यशैली म्हणजे विचलित न होता दीर्घकाळापर्यंत कठीण कामावर खोलवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता होय. यामुळे एक प्रखर एकाग्रता तयार होते ज्याद्वारे तुम्हाला तुमच्या आजूबाजूला काय चालले आहे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून तुमचे सर्वोत्तम कार्य सिद्धीस नेता येते. उथळ कार्यशैली संज्ञानात्मकदृष्ट्या आव्हान नसलेले, यांत्रिक प्रकारचे काम आहे, जे अनेकदा विचलित असतानासुद्धा केले जाऊ शकते. एकविसाव्या शतकातील आपल्या स्पर्धात्मक व्यवस्थेत गहन कार्यशैली एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणून उपयुक्त ठरते.
- तुमच्या क्षमतेला साजेशा अश्या परिपूर्ण सर्वोत्तम परिणामांची निर्मिती करण्यासाठी तुम्हाला गहन कार्यशैलीसोबत एकनिष्ठ असणे आवश्यक आहे. कठीण गोष्टींवर त्वरीत प्रभुत्व मिळवण्याची क्षमता आणि गुणवत्ता व वेग या दोन्ही बाबतीत उच्च स्तरावरची परिणामकारकता या दोन क्षमता आजच्या स्पर्धेच्या युगात यश मिळवण्यासाठी अपरिहार्य ठरतात.
- कठीण गोष्टी लवकर शिकण्यासाठी, तुम्ही विचलित न होता लक्ष त्यावर पूर्णतः केंद्रित केले पाहिजे. तुमचे काम ही एक कला आहे आणि जर तुम्ही तुमची क्षमता सुधारून तिला पूर्ण सन्मान दिला तर कुशल कलाकाराप्रमाणे तुम्ही तुमच्या व्यावसायिक जीवनातील दैनंदिन प्रयत्नांना अर्थपूर्ण बनवू शकता.
- इच्छाशक्तीच्या पलीकडे जाऊन एक निश्चित अशी कार्यपद्धती आणि नित्यक्रम ठरवणे ही सखोल कामाची सवय विकसित करण्याची गुरुकिल्ली आहे. अखंड एकाग्रतेच्या स्थितीत संक्रमण करण्यासाठी आणि ती एकाग्रता टिकवून ठेवण्यासाठी तुमच्या मर्यादित इच्छाशक्तीचा सुयोग्य वापर होण्यासाठी हे आवश्यक आहे.
- तुमच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी अनेक भिन्न दृष्टीकोन आहेत ज्याला लेखकाने ‘सखोलतेचे तत्त्वज्ञान/दृष्टीकोन’संबोधले आहे.
तपस्वी दृष्टीकोन हा सखोल कार्यशैलीचा सर्वाधिक समर्पित प्रकार आहे आणि त्यात तुमचे सर्व कामाचे तास एका उच्च-स्तरीय केंद्रबिंदूवर घालवणे अपेक्षित आहे. यासाठी सोशल मीडिया, फोन, इंटरनेट ब्राउझिंग किंवा ईमेल यांचा त्याग करावा लागेल. या दृष्टिकोनासाठी कोणतीही निश्चित कालमर्यादा नाही, मात्र त्याचे अनुसरण करण्यासाठी किमान एकक हा एक पूर्ण दिवस असतो. हा दृष्टीकोन जे नकारात्मक परिणामांशिवाय त्यांच्या कामात मग्न राहू शकतात अशांसाठी अर्थात प्राध्यापक, स्वतंत्र संशोधकांसाठी सर्वोत्कृष्ट ठरतो.
द्विपक्षी दृष्टीकोनात आपल्याला जीवनातील इतर क्रियाकलाप टिकवून सोबतच मोठ्या प्रमाणात सखोल कार्यशैलीचे पालन करता येते. यात तुमचा वेळ गहन आणि उथळ भागांमध्ये विभागण्यात येतो. दिवस आणि आठवडे किंवा एका वेळी संपूर्ण महिने असे एकक या विभाग्निला वापरता येते. हा दृष्टीकोन अशा लोकांसाठी उपयुक्त आहे जे त्यांच्या उथळ, नियमित कामाच्या जबाबदाऱ्या पूर्णपणे काढून टाकू शकत नाहीत किंवा दुर्लक्ष करू शकत नाहीत.
लयबद्ध तत्त्वज्ञान बर्यापैकी स्थिर वेळापत्रक असलेल्या व्यक्तींसाठी आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या दिन्क्र्मातील किती वेळ गहन कार्यशैलीसाठी राखून ठेवता येतो, हे माहित असणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हाला रोजची “लय” पकडणे शक्य होते.तुमचे उरलेले तास उथळ कामासाठी सोडणे या पद्धतीत शक्य आहे. गहन काम करताना तुमचा संपूर्ण दिवस लागणार नाही, तरीही तुम्ही दररोज त्यासाठी वेळ सुनिश्चित करणे आवश्यक आहे. पुस्तक लिहिण्यासारख्या कामासाठी हे विशेषतः सुलभ आहे, जिथे दैनंदिन दबाव नसतो. एक लयबद्ध सवय तयार केल्यास तुम्हाला या प्रकाराची अंमलबजावणी करण्यास मदत होऊ शकते.
पत्रकारितेचे तत्वज्ञान हे त्या लोकांसाठी एक पर्याय आहे जे त्यांच्या दिवसांमध्ये कमी किंवा शून्य नियमितपणाने सतत वाटचाल करत असतात. या लोकांचा नियमित, संरचित दिनक्रम निश्चित करणे फार अवघड असते. जेव्हा जेव्हा मोकळा वेळ येतो तेव्हा गहन कार्यशैलीचा वापर करणे अर्थात पत्रकारांच्या कामाच्या पद्धतीची नक्कल करणे या प्रकारात अपेक्षित आहे. परंतु जेव्हा जेव्हा संधी येते तेव्हा त्वरीत लक्ष केंद्रित करणे व गहन कार्यशैलीचा अवलंब करणे यासाठी शिस्त विकसित करावी लागते.
- गहन कार्यशैलीचा नित्यक्रम तयार करणे ही या पद्धतीतील पुढची पायरी आहे. तुमच्या वेळेनुसार सराव करणे आणि तुमचा सर्वोत्तम एकाग्रतेचा काळ कुठला याबद्दल विचार करणे हा गहन कार्यशैलीच्या सवयीसह यशस्वी होण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. हा नित्यक्रम तयार करताना स्थान, कालावधी,रचना, आवश्यकता अचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते.
- प्रत्येक गहन कार्यशैली सत्राचा एक स्पष्ट उद्देश आणि ध्येय असावे. तुमचा मेंदू एक विशिष्ट उद्दिष्ट असताना अधिक गुंतलेला असतो आणि तुमचा वेळ सखोलपणे काम केल्याने अधिक प्रभावी परिणाम मिळतात. वेळेची मर्यादा लादल्याने तुमचे गहन कार्य अधिक तीव्र होऊ शकत व याने अभावाच्या मानसिकतेचा वापर करून कार्यक्षमता वाढवता येते. यासाठी टाइम ब्लॉकिंग ही एक उत्तम पद्धत आहे. तुमच्या गहन कार्यक्षेत्राबाहेरील सर्व माध्यमे किंवा विषय उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करू शकतात. तुमचे सर्व लक्ष तुमच्या उद्दिष्टावर केंद्रित आहे याची खात्री करण्यासाठी तुम्ही कठोर असणे आवश्यक आहे.
- तुमच्या कामगिरीचे पुनरावलोकन केल्याशिवाय तुम्ही सुधारणा करू शकत नाही. तुम्ही तुमचा वेळ कसा घालवला याचा मागोवा घ्या आणि सकरात्मक दबावाची भावना निर्माणकरून स्वतःचे मूल्यमापन करा. काही लोकांना प्रत्येक आठवड्यासाठी लक्ष्य निश्चित करायला आवडते (उदा. “पृष्ठांची X संख्या वाचा” किंवा “शब्दांची X संख्या लिहा”) ज्यायोगे त्यांना एका सुनिश्चित गतीने कार्य करता येते.
- प्रखर एकाग्रतेचे लांब पल्ले गुणवत्तापूर्ण विश्रांतीसह संतुलित केले पाहिजेत. म्हणून एकदा तुम्ही गहन कामाचे सत्र पूर्ण केले की विसावा घ्या. नवीन गोष्टीनी स्वतःला विचलित न करता किंवा ताण न आणता एक संज्ञानात्मक विश्रांती ही कार्यतत्परता वाढवते. तुम्ही दीर्घ गहन कार्य सत्रांमध्ये निरोगी विराम तयार करण्यासाठी गहन विश्रांती देखील वापरू शकता.
- अंमलबजावणीच्या चार शाखा-
अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा – तुमच्या गहन कामाच्या वेळेत तुमच्या सर्वात महत्त्वाच्या उद्दिष्टांकडे तुमचे प्रयत्न निर्देशित करा. तुमचे दीर्घकालीन उद्दिष्ट पूर्ण न करणारे अडथळे दुर्लक्षित करणे सोपे करण्यासाठी तुमची सर्वात मोठी उद्दिष्टे तुमच्या मनाच्या अग्रभागी ठेवा. तुमच्या डेस्कवर स्टिकी नोट्स वापरून पहा ज्याने तुमच्या सर्वोच्च प्राधान्यक्रमांची यादी कायम तुमच्या नजरेपुढे राहील.
पुढे नेणाऱ्या उपायांवर कृती करा – मागे पडलेल्या घटकांवर लक्ष केंद्रित केल्यापेक्षा पुढे नेणाऱ्या उपायांवर गहन कार्यशैली वापरून काम केल्यास ते अधिक फायदेशीर ठरते. एकाग्रतेच्या स्थितीत तुम्ही दर आठवड्याला घालवलेल्या तासांची संख्या वाढवून तुम्ही उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी स्वाभाविकपणे मजबूत स्थितीत येऊ शकता.
एक आकर्षक गुणफलक ठेवा – तुम्ही गहन कार्यशैलीमध्ये किती तास घालवता याची गणना ठेवा आणि तुम्हाला प्रेरित ठेवण्यासाठी तुमचे यश कुठेतरी प्रदर्शित करा. तुम्ही तुमचा गुणफलक वेळ ट्रॅकिंग साधनांसह स्वयंचलित करू शकता किंवा साधा कागद पेन वापरूनही तुम्ही हे साध्य करू शकता.
उत्तरदायित्वाची एक लय तयार करा – उत्तरदायित्व भागीदार नसल्यास आपल्या प्रगतीचे दैनिक किंवा साप्ताहिक पुनरावलोकने करून स्वतःला दिलेले उद्दिष्ट पूर्ण करा. तुमचे प्रदर्शन तुमच्या स्कोअरकार्डवर तपासा आणि तुम्ही ठरवलेल्या ध्येयांमध्ये तुम्ही कमी का पडत आहात याचे मूल्यांकन करा. जर तुम्ही ते सहजतेने ओलांडत असाल, तर स्वतःला अजून मोठे उद्दिष्ट निश्चित करा.
new thought I like
LikeLiked by 1 person
I like
LikeLiked by 1 person